धाराशिव
जिल्ह्यातील पूरस्थिती आता ओसरत असली तरी आरोग्याच्या समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असून तालुकास्तरावर साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी १ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.
२२ ते २८ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे परंडा, भूम, वाशी आणि कळंब तालुक्यातील ५४ गावे बाधित झाली होती. त्यात भूम तालुक्यातील १७, परंड्यातील २२, वाशीतील ७, कळंबमधील ११ आणि धाराशिव तालुक्यातील १ गावाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांना भेट देऊन आरोग्य विभागाच्या कार्याचा आढावा घेतला. जिल्हास्तरीय आरआरटी सदस्य आणि इतर अधिकारी यांनीही पाहणी करून स्थिती तपासली.
साथरोग स्थिती
पूरग्रस्त भागात कोणत्याही गावामध्ये साथरोग उद्रेक झालेला नाही. आरोग्य विभागाकडून दैनंदिन सर्वेक्षण करून जलजन्य व कीटकजन्य आजारांचे १५ रुग्ण, ५०६ गरोदर माता, १७०५ उच्च रक्तदाब रुग्ण, १३०३ मधुमेही रुग्ण, ३५ क्षयरोगी व ३४ गंभीर रुग्ण शोधण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाची कार्यवाही
पूरग्रस्त गावांमध्ये आरोग्य पथकांकडून दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येत आहे. २७ सप्टेंबर रोजी सर्व विभागांच्या समन्वयातून संयुक्त सर्वेक्षण झाले असून, २ ऑक्टोबर रोजी पुनः सर्वेक्षणाचे नियोजन आहे. जिल्हा परिषदेत २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ८५ आशा स्वयंसेविकांना साथरोग किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. २३८ पाणी स्रोतांच्या शुद्धीकरणासाठी तपासणी व कार्यवाही करण्यात आली आहे.
रुग्णवाहिका उपलब्ध
जिल्ह्यातील ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध आहे. १८७ फॉगिंग मशिन्स ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत आहेत. औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे.











