धाराशिवमध्ये शिवसेनेचा (उबाठा) एल्गार
धाराशिव (प्रतिनिधी)
अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून आलेल्या वसुलीच्या नोटिसांनी अधिकच जखमा झाल्या आहेत. या अन्यायाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ने धाराशिवमध्ये आक्रमक आंदोलन छेडले. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कार्यकर्त्यांनी बँक नोटिसांची होळी करून सरकारला कठोर इशारा दिला.
पावसाचा कहर झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पिक डोळ्यासमोर वाहून गेले आहे, तर अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत सरकार मधील अनेकांनी दौरे करुन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दौरा नको ठोस मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. दोन महिन्यात आलेल्या पावसाने शेतकरी पुर्णथा उध्वस्त झाला आहे. पुढे जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यांना दिलासा देण्याऐवजी बँका नोटिसा पाठवल्यामुळे बँकांची दादागिरी उघड झाली आहे. त्यावरून शिवसेना (उबाठा) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँकेच्या नोटीस ची होळी केली आहे.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले, “एकीकडे शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झाला असताना, दुसरीकडे बँका नोटिसा पाठवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.” सरकारने दिलेली कर्जमाफीची आश्वासने तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे
आमदार कैलास घाडगे पाटील म्हणाले, “हे आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पेटवलेली ठिणगी आहे, जी आता मशाल बनून पेटणार आहे. जोपर्यंत सरकार दिलेली वचने पूर्ण करत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरू राहील.”
.











