कळंब (प्रतिनिधी)
कळंब पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत अखेर नशिबाने महायुतीला साथ दिली असून, सभापतीपदी शिवसेनेच्या सौ. राजश्री धनंजय वरपे तर उपसभापतीपदी भाजपच्या सौ. प्रणिता प्रणव चव्हाण यांची निवड झाली आहे. दोन्ही गटांकडे समसमान संख्याबळ असल्याने अखेर ‘चिठ्ठी’ टाकून हा निकाल लावण्यात आला, ज्यामध्ये महायुतीने बाजी मारली.
८ विरूद्ध ८ असा रंगला पेच!
सकाळी १० वाजल्यापासूनच पंचायत समिती परिसरात राजकीय हालचालींना वेग आला होता. महायुतीकडून राजश्री वरपे (शिवसेना) आणि प्रणिता चव्हाण (भाजप) रिंगणात होत्या, तर उबाठा गटाने सीमा टेकाळे आणि मनोज घोगरे यांना मैदानात उतरवले होते. मतदानानंतर दोन्ही बाजूंकडे प्रत्येकी ८-८ मते पडल्याने सभागृहात शांतता पसरली होती. अखेर नियमानुसार एका लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली आणि नशिबाचा कौल महायुतीच्या पारड्यात पडला.
विरोधकांच्या गोटात शांतता, महायुतीचा जल्लोष
निकाल जाहीर होताच शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत केला.
विकासाचा नवा अध्याय?
नवनिर्वाचित सभापती सौ. राजश्री वरपे आणि उपसभापती सौ. प्रणिता चव्हाण यांनी निवडीनंतर मतदारांचे आभार मानले. तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न, रस्ते आणि पाणी योजनांना प्राधान्य देऊन सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या ऐतिहासिक विजयावेळी शिवाजी कापसे, लक्ष्मीकांत हुलजुते, अनंत वाघमारे, अरुण चौधरी, दत्तात्रय साळुंखे यांसह महायुतीचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
“हा विजय कार्यकर्त्यांच्या कष्टाचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे. कळंबच्या विकासासाठी आता हे नवे नेतृत्व प्रामाणिकपणे काम करेल, यात शंका नाही.”
— अजित पिंगळे (शिवसेना जिल्हाप्रमुख)










