नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची घेतली भेट
कळंब
शहरात वाढत्या गुन्हेगारीने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. शाळा आणि महाविद्यालय परिसरात रोडरोमियोचा उघड उच्छाद आणि पोलिसांची ढिलाई या सगळ्यामुळे संताप वाढत आहे. महिलांची आणि विद्यार्थिनींची सुरक्षितता धोक्यात येत असल्याची तीव्र भावना शहरात पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची भेट घेत कळंबमध्ये तातडीने निर्भया पथक स्थापन करण्याची ठाम मागणी केली. “आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. शाळा, महाविद्यालये, बसस्थानके आणि मुख्य चौकांमध्ये नियमित व तीव्र गस्त वाढवून रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मागील काही दिवसांपासून शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरात रोडरोमियोचा उच्छाद मांडला आहे. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाली आहे. या संदर्भात नगराध्यक्षा सुनंदा कापसे यांनी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची भेट घेऊन शहरातील इतर गंभीर प्रश्नही अधोरेखित केले. अल्पवयीन मुलांच्या हातात सर्रास दुचाकी वाहने दिसत असून वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे. सिगारेट, सुलोचन आणि अमली पदार्थांच्या वाढत्या वापराकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर तातडीने विशेष मोहीम राबवली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी खंत व्यक्त केली आहे.
यावेळी धाराशिवच्या नगराध्यक्षा नेहा काकडे, उपनगराध्यक्ष लखन गायकवाड, शिवसेना गटनेते अतुल कवडे, भाजपा गटनेते हर्षद अंबुरे, पाणीपुरवठा सभापती भूषण करंजकर, नगरसेविका पूजा धोकटे आदी उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र आल्यासच शहर सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
निर्भया पथक कोठे?
दरम्यान, निर्भया पथकाची तातडीने नियुक्ती करून कठोर कारवाई झाली नाही, तर नागरिक रस्त्यावर उतरतील, अशी कुजबुज शहरात सुरू झाली आहे. कळंबमध्ये आता शब्दांपेक्षा कृतीचीच अपेक्षा आहे.
कळंबमध्ये कायद्याचा धाक हवा;
कायदा आणि सुव्यवस्था टिकवायची असेल तर पोलिस प्रशासनाने आता ठाम आणि कडक भूमिका घेणे अपरिहार्य ठरणार आहे. शहरात गुन्हेगारीला आळा बसावा, प्रत्येक चौकात कायद्याचा धाक जाणवावा आणि पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी, यासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. कळंबमधील प्रत्येक मुलगी आणि महिला सुरक्षित असणे ही केवळ अपेक्षा नाही, तर प्रशासनाची जबाबदारी आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कळंब पोलिसांनी ठोस पावले उचलून शहरात सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.









