राष्ट्रवादी (अजित पवार गट)चा थेट इशारा
कळंब
नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीमध्ये घमासान थांबण्याचे नाव घेत नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) “आमची कोणासोबत युती नाही” अशी सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कळंब नगरपालिका निवडणूक रंगात येऊ लागली आहे. यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होत आहे. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने चुरस वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षातील नेते प्रभागात प्रबळ उमेदवारांच्या शोधात आहेत. विशेष म्हणजे, आघाडी आणि युतीमधील प्रमुख पक्षांमध्ये “या प्रभागात आमचा उमेदवार, त्या प्रभागात तुमचा उमेदवार” अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
मात्र घटक पक्षांना सन्मानजनक वागणूक मिळत नसल्यामुळे नाराजीची खदखद सुरू झाली आहे. त्यामुळे काही घटक पक्ष थेट विरोधात जाण्याचा पवित्रा घेत आहेत. ही नाराजी दूर होते का, नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमची कोणासोबत युती नाही
महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये सुरुवातीपासूनच शीतयुद्ध सुरू आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने थेट उघड पवित्रा घेतला असून, शहराध्यक्ष दत्तात्रय तनपुरे यांनी सोशल मीडियावर “अफवांवर विश्वास ठेवू नका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कळंब शहरात कोणासोबतही युती झालेली नाही” अशी पोस्ट केली आहे.
स्वबळावर लढणार
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी सांगितले की, कळंब नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगराध्यक्ष पदासह सर्व २० जागांवर स्वबळावर लढणार असून, पक्ष प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहील.











