कळंब
शिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीतर्फे वनेशन बिल्डर अवॉर्ड वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटात पार पडला.
कळंब येथील जयभवानी मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्यात डीजीई जयेश पटेल (अध्यक्ष), रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. डॉ. अभिजित जाधवर, सचिव रो. शाम जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सात आदर्श शिक्षकांचा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून शिक्षक हेच राष्ट्रनिर्माते हा महत्त्वपूर्ण संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
डिस्ट्रिक्ट डीजीई जयेश पटेल यांनी यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षकांना देशाचे खरे आधारस्तंभ संबोधले. रोटरीच्या कार्याची माहिती देताना ते म्हणाले, रोटरी क्लबने काही वर्षांपूर्वी पोलिओ निर्मूलनाचा वसा घेऊन काम केले आणि आज संपूर्ण जग पोलिओमुक्त झाले आहे. त्याच धर्तीवर, रोटरी क्लबने आता साक्षरता अभियान राबवण्याचा संकल्प केला आहे.
या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून सुशील तीर्थकर, संजय घुले आणि श्रीकांत कळंबकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील तीर्थकर आणि संजय घुले यांनी केले, तर रोटरी सचिव शाम जाधवर यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा महत्त्वपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी रोटरीचे सर्व सदस्य आणि कळंबमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिक्षकांचा सन्मान
शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे रमेशकुमार दादासाहेब काकडे, शिवाजी भगवान बांगर नंदा पांडुरंग घुटे, उत्रेश्वर चंदर शिंदे, विजय नारायण जायभाय, गीताक्षी गोविंदराव नागटिळक, बालाजी पांडुरंग जाधवर या सर्व शिक्षकांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट गणेश मंडळांचाही गौरव
कळंब शहरातील उत्कृष्ट गणेश देखावा पारितोषिकांचेही वाटप करण्यात आले. यामध्ये लोकमान्य गणेश मंडळ, श्रीशिवशंकर गणेश मंडळ आणि व्यंकटेश गणेश मंडळ यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.










