कळंब
नगर परिषद निवडणुकीत दोन्ही आघाड्यांतून उमेदवार ठरवण्याचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. नामनिर्देशनासाठी उरलेले दिवस कमी होत असताना अजूनही अधिकृत उमेदवारांची घोषणा झाली नाही. जागा वाटपावरून निर्माण झालेला तिढा आता अंतर्गत संघर्षाच्या टोकाला पोहोचला आहे. काही गट नाराज आहेत, काही जण पर्याय शोधत आहेत आणि या गोंधळात तिसरी आघाडी उभी राहण्याच्या चर्चेला मोठा वेग मिळत आहे.
कळंब नगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत आहे. शहरात दोन्ही बाजूंची ताकद जवळपास समान असल्यामुळे तिकीटवाटपाचा तणाव आणखी चिघळला आहे. वरिष्ठ नेते आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी ठामपणे भूमिका घेत आहेत. विद्यमान सदस्यांना पुन्हा उमेदवारी द्यायची की नवे चेहरे आणायचे यावरून सुरू असलेली चर्चा ताणली आहे. आरक्षण बदल, जागा बदल आणि स्थानिक गटबाजी यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये दबाव ताण वाढत चालला आहे. या घडामोडींचा परिणाम कार्यकर्त्यांवर दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी नाराजी वाढली आहे आणि बैठका तापल्या आहेत. निवडणुकीच्या उंबरठ्यावर उमेदवारांची घोषणा न झाल्यामुळे मतदारही संभ्रमात आहेत. कोणत्या प्रभागात कोण उतरणार हे अद्याप स्पष्ट नाही. एकूणच वातावरणात अनिश्चितता वाढली आहे. जागा वाटपातून सुरू झालेला संघर्ष थांबेल अशी चिन्हे दिसत नाहीत. याचा थेट परिणाम निवडणूक लढतीच्या समीकरणांवर होण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या आघाडीची चाहूल..
महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपात काही घटक पक्षांना समाधानकारक स्थान मिळत नसल्यामुळे घटक पक्षांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. चर्चा आणि बैठकींमध्ये त्यांची भूमिका बाजूला ठेवल्याची भावना वाढली आहे. त्यामुळे काही नेते स्वतंत्र पॅनेलचा विचार पुढे रेटताना दिसत आहेत. स्थानिक पातळीवर या हालचालींना चांगलीच गती मिळाली असून तिसरी आघाडी उभी राहण्याच्या चर्चेलाही जोर आला आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास दोन्ही मोठ्या आघाड्यांच्या गणितात मोठा बदल होऊ शकतो आणि त्यांना थेट फटका बसण्याची शक्यता आहे.
काही उमेदवार दुसऱ्या गटांशी संपर्कात..
अनेक संभाव्य उमेदवारांनी निवडणुकीची तयारी वेगात सुरू केली आहे. काही ठिकाणी हाळद लावून निवडणूक मोहीमेची सुरुवातही झाली आहे. पण जागा अजून निश्चित न झाल्यामुळे त्यांच्यात संभ्रम वाढला आहे. या अनिश्चिततेचा फायदा घेत काही उमेदवार दुसऱ्या गटांशी संपर्कात असल्याची चर्चा जोरात आहे. परिस्थिती अशीच राहिली तर दोन्ही आघाड्यांत पाडापाडी होण्याची शक्यता वाढू शकते.










