स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
कळंब |
शांत शेतवस्तीवर राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य करून मध्यरात्री दरोडे टाकणाऱ्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखा यांनी कळंब तालुक्यातील मोहा येथून बेड्या ठोकल्या आहेत. ग्रामीण भागात भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या या टोळीचा अखेर पोलिसांनी ठोस कारवाईत पर्दाफाश केला आहे.
दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी उपळा शिवारातील कविता ज्ञानदेव कसबे यांच्या शेतवस्तीवरील घरात घुसून आरोपींनी थेट मारहाण करत सोन्याचे दागिने लंपास केले. वयोवृद्धांवर हात उगारण्याइतकी निर्लज्जता दाखवणाऱ्या या गुन्हेगारांविरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तपासाला वेग देण्यात आला.
पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या थेट आदेशानुसार दि. १० जानेवारी २०२६ रोजी सपोनि सुदर्शन कासार व पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कळंब तालुक्यातील मोहा येथील पारधी पिढीवर अचानक छापा टाकला. या धडक कारवाईत अनिल उर्फ लल्ल्या बादल शिंदे, छगन श्रीपती काळे, बिभीषण उर्फ बबड्या दिलीप काळे व विजय उर्फ तुंबड्या आप्पा पवार या चारही सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी एकामागून एक गुन्ह्यांची कबुली देत धक्कादायक माहिती उघड केली.
आरोपींनी दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी विमानतळ परिसर धाराशिव, गोळेगाव (ता. वाशी) व अंतरवली (ता. भूम) येथे दरोडे व चोरी केल्याचे मान्य केले. पोलिसांनी आरोपींकडून १६.२ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच चोरीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या असून या मोटारसायकली शिर्डी व जामखेड येथून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा, जबरी चोरी व वाहन चोरीचे तब्बल ०८ गंभीर गुन्हे उघडकीस आणत २,०७,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेतवस्तीवर दहशत माजवणाऱ्यांना कुठेही पळ काढता येणार नाही, असा स्पष्ट इशारा या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.
ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार यांच्यासह शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, शोभा बांगर, रत्नदीप डोंगरे व नवनाथ गुरव यांच्या पथकाने पार पाडली.









