कळंब :
शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी नगर परिषद कळंबच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पूरक पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्ष सुनंदा शिवाजी कापसे यांच्या हस्ते जलकुंभ प्रकल्पाचे उद्घाटन व भूमिपूजन उत्साहात पार पडले.
शहरातील पुनर्वसन सावरगाव येथील हनुमान मंदिराजवळील जलकुंभाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यरमाळा रोडवरील कोर्टाजवळ उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाचे भूमिपूजनही नगराध्यक्ष कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नगर परिषदेचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रकल्पांतर्गत शहरातील विविध भागांमध्ये तीन जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. यामध्ये कोर्ट परिसरात ६ लाख ९९ हजार लिटर क्षमतेचा १६ मीटर उंच जलकुंभ, मार्केट यार्ड परिसरात ९ लाख ६ हजार लिटर क्षमतेचा १२ मीटर उंच जलकुंभ आणि हनुमान मंदिर परिसरात ६ लाख १३ हजार लिटर क्षमतेचा १६ मीटर उंच जलकुंभ उभारण्यात येणार आहे.
या जलकुंभांमुळे शहरातील विविध भागांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्यास मदत होणार असून भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन शहराची पाणी साठवण क्षमता देखील वाढणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान पुनर्वसन सावरगाव येथील हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने नगराध्यक्ष सुनंदा कापसे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रकल्पामुळे कळंब शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठी चालना मिळेल आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी नगर परिषद कळंबच्या सर्व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.











