कळंब
अखेर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अनेक नेते आणि कार्यकर्ते या पदासाठी तयारी करून बसले होते, पण नगरविकास विभागाने “सर्वसाधारण महिला” आरक्षण जाहीर करताच अनेकांच्या राजकीय स्वप्नांचा चुराडा झाला.
कळंब नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी गेल्या काही महिन्यांपासून पातळीवर हालचाली सुरू होत्या. कुणी गटबाजी मजबूत करत होते, तर कुणी सत्ताधाऱ्यांचे दरवाजे ठोठावत होते. मात्र एका आदेशाने सर्व समीकरणे धुळीस मिळाली.
२०२२ मध्ये नवीन प्रभागरचना झाल्यानंतर शहरात १० प्रभाग आणि २० नगरसेवक निश्चित करण्यात आले. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निवडणुकीचे बिगुल पुन्हा वाजले, पण आता मैदान महिलांसाठी खुले झाले आहे.
राजकीय वर्तुळात पुरुषांचे चेहरे उतरले असताना, महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा माहोल आहे. “अखेर महिलांना संधी मिळाली,” असा स्वर शहरात घुमतोय. या निर्णयामुळे अनेकांचे डाव उधळले असले, तरी आता कळंबच्या नगराध्यक्षपदासाठी महिलांमध्येच चुरशीची लढत रंगणार यात शंका नाही.











