कळंब नगर पालिकेत सत्तेचा संग्राम पेटला
कळंब
नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर होताच कळंबच्या राजकारणात भूकंप झाला आहे. सत्तेच्या खुर्चीसाठी जुने प्रतिस्पर्धी पुन्हा आमने-सामने आले आहेत. शहरात उबाठा गट आणि शिवसेना यांच्यात अक्षरशः थंड युद्ध सुरू असून, ८ ऑक्टोबर रोजी नगरसेवकांचे आरक्षण जाहीर होताच हा संघर्ष उफाळून येणार आहे.
  कळंब शहरात शिवसेना व उबाठा गटाची समान ताकद आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची ताकद आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष आणि ११ नगरसेवक निवडून आले होते, तर त्या वेळीच्या उबाठा गटाचे सहा नगरसेवक विजयी झाले होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. नगराध्यक्ष सुवर्णा सागर मुंडे आणि माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी सत्तेवर मजबूत पकड ठेवली होती, तर विरोधी बाकावर राहून विरोधकांची भूमिका शिवाजी कापसे यांनी निभावली होती.
     मुंदडा आणि कापसे हे दोघेही एकेकाळी राजकीय प्रतिस्पर्धी होते, पण काळ बदलला आणि काही नाट्यमय घडामोडींमुळे दोघेही शिंदे यांच्या शिवसेनेत आले. मात्र जुनी वैराची ठिणगी पुन्हा पेटली. परिणामी मुंदडा यांनी शिंदे गट सोडून आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उबाठा गटात प्रवेश केला.
      विशेष म्हणजे शहरात शिवसेना नेते अजित पिंगळे, तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते यांची ताकद वाढलेली असून, त्यापाठोपाठ काँग्रेस (आय) चे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर यांचीसुद्धा शहरात दखलपात्र ताकद आहे.
     नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने शहरात नव्या प्रकारचे राजकारण सुरू झाले आहे. अनेक बडे नेते आता ‘सौभाग्यवतीला पुढे करायचं’ या रणनितीवर काम करत आहेत. सत्तेच्या गादीवर बसण्यासाठी घराघरात गुप्त बैठका, फोन कॉल आणि अंतर्गत फिल्डिंग सुरू झाली आहे.
१० प्रभाग.. 
नगर पालिकेत या वेळी १० प्रभागांतून २० नगरसेवक निवडले जाणार आहेत. नवखे उमेदवार मोठ्या उत्साहात तयारी करत असले तरी जुने मुरब्बी त्यांना संधी देतात का, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. कळंब नगर पालिकेची निवडणूक यावेळी तापलीच आहे. गटबाजी, जुनी शत्रुत्वं आणि सत्तेची लालसा यामुळे या निवडणुकीत संघर्ष अटळ आहे.
			










