कळंब (प्रतिनिधी)
नगर पालिका निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. महायुतीतील घटक पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. त्यात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) निर्णायक भूमिका घेण्यासाठी सज्ज झाली आहे.
कळंब नगर पालिका ही जिल्ह्यातील महत्वाची आणि राजकीय घडामोडींसाठी नेहमीच चर्चेत राहणारी आहे. प्रत्येक पक्षाला ही नगर पालिका आपल्या ताब्यात घ्यायची आहे. यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. परंतु दोन्ही आघाड्यांतील घटक पक्षांना सन्मानजनक वागणूक न मिळाल्याने नाराजी वाढताना दिसत आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष शिवाजी सिरसट यांनी सांगितले की, “महायुतीत राहून कायम मुस्कटदाबी सहन करायची नाही,” असा ठाम निर्धार घेत पक्षाने आता स्वतंत्र भूमिका घेण्याचा निर्णय केला आहे. यासाठी रिपाई (आठवले गट) च्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक शनिवारी सकाळी ११ वाजता कळंब येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो आणि रिपाईची भूमिका कोणत्या दिशेने वळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











