कळंब
कळंब नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या उपस्थितीत व तालुकाध्यक्ष श्रीधर भवर यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली असून, आघाडीतील जागा वाटप आणि उमेदवार निवड या दोन्ही बाबींवर तीव्र चर्चा झाली.
डॉ. प्रतापसिंह पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीत राहूनच निवडणूक लढवायची आहे. मात्र कार्यकर्त्यांनाही न्याय मिळायला हवा. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जिंकण्याची शक्यता जास्त असल्यास, आघाडीतील समन्वयकांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल.”
तालुकाध्यक्ष श्रीधर भवर यांनी नगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे मिळावे, अशी मागणी केली. जिल्हा प्रवक्ता प्रा. तुषार वाघमारे म्हणाले, “आपण आघाडीत शिवसेनेला साथ दिली, आता त्यांनीही त्याचे उत्तर सहकार्याने द्यावे.”
शहराध्यक्ष मुसद्दीक काझी यांनी समाजासाठी निष्ठेने काम करणाऱ्यांना संधी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. दहा प्रभागांमधून तब्बल 26 इच्छुकांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे सक्षम उमेदवारांची मोठी फळी असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.
बैठकीस राष्ट्रवादी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल माने, तालुका उपाध्यक्ष आत्माराम बिक्कड, सामाजिक न्याय आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनंदा भोसले, ॲड. मनोज चोंदे, विद्यार्थी जिल्हा सरचिटणीस अतिश वाघमारे, अक्रूर सोनटक्के, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस (SP) तालुकाध्यक्ष भीमा हगारे, शोभा मस्के, स्वाती भातलवंडे, संतोष पवार, बाबासाहेब कुंभकर्ण, संकेत नरवडे, विठ्ठल कोकाटे, श्रीकांत मिटकरी, नितीन वाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. मीनाक्षी भवर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर
बैठकीत प्राध्यापक मीनाक्षी भवर यांच्या नावावर सर्वानुमते सहमती झाली आहे. कळंब नगरपरिषदेच्या रणधुमाळीत या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली असून, पुढील काही दिवसांत आघाडीतील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.










