धाराशिव
धाराशिव शहरातील तब्बल 140 कोटींच्या रस्ते कामांना कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर फडणवीस सरकारने त्यांना स्थगिती दिली. मात्र याचा दोष विरोधकांवर ढकलला जात आहे. “चोराच्या उलट्या बोंबा” असाच प्रकार आता जिल्ह्यात सुरु झाला आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी केली.
प्रवक्ते तानाजी जाधवर म्हणाले, राज्यात सत्ताधाऱ्यांचा विरोधकांप्रतीचा दृष्टिकोन सर्वांनाच ठाऊक आहे. शहरासाठी मंजूर झालेल्या 140 कोटी निधीवरून तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत आणि भाजप आमदार राणा पाटील यांच्यातच श्रेयवाद सुरू होता. फेब्रुवारी 2024 पासून निविदा प्रक्रियेस तब्बल 20 महिने लागले. या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचं आरोप त्यांच्या मित्रपक्षाकडूनच झाले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती आणल्याचं ढोल वाजवणारे भाजप आमदार राणा पाटील, आता त्यांच्या सरकारनेच रस्त्यांच्या कामांना स्थगिती दिल्यावर मात्र विरोधकांवर दोष ढकलतात. ‘दुकान तुमचं, दुकानदारी तुमची आणि तोटा आमच्यामुळे हे कोण पटवून घेईल?”
जाधवर यांनी आठवण करून दिली की, जुलै 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर महायुती सरकार आलं, आणि या सरकारने मागील शासनातील अनेक मंजूर कामांना स्थगिती दिली. न्यायालयीन निर्णय झाल्यानंतरही ती स्थगिती उठवली गेली नाही. “आमच्या मताला एवढं महत्त्व असतं तर ही कामे रद्द झाली असती का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, “नव्या सरकारने तीच कामे पुन्हा मंजूर केली, पण आजतागायत एकही काम हाती घेतलेलं नाही. उघडपणे स्थगिती देणारे तुम्हीच, आणि तरीही आम्हालाच दोष देणं हे हास्यास्पद आहे. उदाहरणार्थ, डीपीसी निधी – मुख्यमंत्री सांगेल तेव्हा कोणत्याही कामाला स्थगिती दिली जाते. मग रस्त्यांच्या कामांबाबत विरोधकांवर बोट दाखवणं हा केवळ विनोदच आहे.”
जाधवर यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट हल्ला चढवत विचारलं, “दुसऱ्यांना अपप्रवृत्ती म्हणणाऱ्यांची स्वतःची प्रवृत्ती काय आहे? अपात्र ठरवलेल्या गुत्तेदाराला पात्र ठरवण्यासाठी तुम्ही वीस महिने केलेली धडपड तुमची प्रवृत्ती स्पष्ट दाखवते.”
ते पुढे म्हणाले, “माझ्याच मनासारखं झालं तर ठीक, नाहीतर काहीच होऊ द्यायचं नाही, या मनोवृत्तीमुळे जिल्ह्याचं नुकसान होत आहे. स्वतःचे दोष लपवून दुसऱ्यांना दोषी ठरवणे हा निव्वळ बालिशपणा आहे.”
शेवटी जाधवर म्हणाले की, आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. दोष कोणाचा हे त्यातून समोर येईलच. पण शहरातील लोकांना वीस महिन्यांपासून रस्त्यांमुळे भोगाव्या लागणाऱ्या अडचणी संपाव्यात आणि ही कामे लवकर सुरु व्हावीत, हीच आमची प्रामाणिक भावना आहे.










