शिवसैनिकांचा मदतीचा हात, शेतकऱ्यांचा गोड दसरा
कळंब
सप्टेंबरच्या पुरात उद्ध्वस्त झालेली घरं, चिखलात गडप झालेला संसार, अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू आणि मनातलं नैराश्य अशा परिस्थितीत पूरग्रस्त शेतकरी अक्षरशः खचला होता. पण दसऱ्याच्या दिवशी शिवसैनिकांनी थेट बांधावर जाऊन मदतीचा हात दिला. घरं स्वच्छ केली, जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं आणि घराला पुन्हा सणासुदीचं रूप दिलं. त्या क्षणी एका शेतकऱ्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलवर भावनिक शब्दांत सांगितलं साहेब, तुम्ही आम्हाला जी मदत केली, त्यामुळे आमचा दसरा गोड झाला आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना बसला. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा मेळावा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. दसरा मेळाव्यासाठी मुंबईत न येता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कळंब तालुक्यातील आथर्डी गावातील ग्रामस्थांना आधार देण्याचा निर्णय घेतला. युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना नेते अजित पिंगळे, भगवान देवकाते, शिवसेनेचे समन्वयक नितीन लांडगे, तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, उपजिल्हा प्रमुख आनंत वाघमारे यांनी काल त्यांच्या घरी जाऊन त्यांचे घर स्वच्छ केले. घरातील अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू जागेवर ठेवल्या, घराचा परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक केला, गावातील अंगणवाडी पुराच्या पाण्याने खराब झाली होती तीदेखील शिवसैनिकांच्या साथीने पाण्याने धुवून, झाडून स्वच्छ केली. तसेच पुरात पूर्णपणे उध्वस्त झालेल्या कुटुंबांना २६ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना आधार दिला. शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्याला मदत करून दसरा साजरा करत आहेत. ‘शिवसेनेचे धोरण बांधू पूरग्रस्तांच्या मदतीचे तोरण’ हेच यंदाच्या दसऱ्याला शिवसैनिकांनी सिद्ध करून दाखवले आहे.
आशेचे तोरण
कालपर्यंत घरासमोर अंधार होता. पण मदत मिळाल्याने आज दारात सुंदर रांगोळी उमटली, घराला तोरण बांधले गेले आणि कुटुंबाने सगळ्या दुःखातही दसरा साजरा केला. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा जगण्याची आस दिसू लागली.
भावनिक क्षण..
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या कुटुंबाशी संवाद साधला. महिलांनी त्यांना आपट्याचे पान देत लाडक्या भावाला बहिणीकडून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. त्या क्षणी पूरग्रस्त कुटुंबाच्या डोळ्यातला आनंद आणि भावनेचा ओलावा पाहून वातावरण भारावून गेले











