धाराशिव: मस्साजोग (ता. केज, जि. बीड) येथील सरपंच आणि मराठा समाजातील कार्यकर्ते संतोष पंडितराव देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करून खून करण्यात आला. या घटनेचा निषेध करत सकल मराठा समाजाने धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात, या खून प्रकरणाचा तपास जलद गतीने करून सर्व संबंधित आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, सकल मराठा समाज तीव्र आंदोलन उभारेल असा इशाराही देण्यात आला आहे.
संतोष देशमुख हे मस्साजोग गावचे सरपंच होते आणि मराठा समाजातील कार्यकर्ते होते. त्यांच्या खुनामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना अटक करण्यासाठी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने करण्यात येत आहेत.
सकल मराठा समाजाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “श्री. संतोष देशमुख यांच्या खुनामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीच्या अटकेसाठी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने करण्यात येत आहेत. श्री. संतोष देशमुख हे मस्साजोग गावचे सरपंच होते. सदर घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. त्यामुळे सदर प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सर्व संबंधित आरोपींना अटक करुन कठोर शासन करणे अत्यंत गरजेचे आहे.”
या निवेदनावर बलराज रणदिवे ,अभिजीत माणिकराव सूर्यवंशी, अजय अंकुश नाईकवाडी, उमेश वसंत मगर, मुकुंद लक्ष्मण घाटगे, आकाश मुंडे, संकेत सूर्यवंशी, गणेश साळुंके, अमोल जाधव आणि अंकुश मगर यांच्या सह्या आहेत.