कळंब 
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले आहे. कोरड्या दुष्काळापासून ओल्या दुष्काळापर्यंत आणि महाप्रलयकारी भूकंपापर्यंत झालेल्या जीवितहानीचा दाखला देत त्यांनी खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
“१९७२ च्या दुष्काळाच्या झळा सोसलेल्या, १९९३ च्या भूकंपातून पुन्हा उभारी घेतलेल्या आपण माणसं आहोत. जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या त्या संकटानंतरही आपण धैर्याने उभं राहिलो. आपल्या वडीलधाऱ्यांनी त्या झळा सहन केल्या, त्यातून लढा दिला, आणि आज आपणही अतिवृष्टी व महाप्रलयाच्या संकटातून नवी ताकद घेऊन उभं राहू,” असे त्यांनी सांगितले.
१९७२ च्या दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त झाले, गावोगावी पाणी आणि अन्नाचा तुटवडा निर्माण झाला. तर १९९३ च्या भीषण भूकंपाने धाराशिव-लातूर परिसरात हजारो जीव गेले, लाखो लोक बेघर झाले. त्या वेदनादायी आठवणी अजूनही डोळ्यांसमोर आहेत. मात्र, या संकटातूनही लोकांनी पुन्हा धैर्याने उभारी घेतली.
आज अतिवृष्टीने गावोगावी हाहाकार माजवला आहे. नदीकाठची गावे जलमय झाली, शेतं-घरे वाहून गेली, शेकडो कुटुंबे उघड्यावर आली. पण या काळात आपण सारे एकत्र राहून, एकमेकांना आधार देत, पुन्हा नव्याने उभे राहायचे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“आपल्या मातीतून शिकलेली ताकद आणि संघर्षाची परंपरा आपल्याला कधीच हरू देणार नाही. या वेळी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि समाजातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली तर नक्कीच आपण पुन्हा उभं राहू. आपली माती, आपला माणूस पुन्हा बहरेल. हाच खरा विजय आहे,” असेही आवाहन आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केले.
			






