धाराशिव
जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले नुकसान वाढतच आहे. २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या आपत्तीत चार जणांचा मृत्यू, पाच जण जखमी, ८१ जनावरे दगावली आणि ६०० हून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
पूराच्या पाण्यात वाहून जाऊन लोहारा, भूम आणि परंडा तालुक्यातील प्रत्येकी एक अशा तिघांचा मृत्यू झाला. तर उमरगा तालुक्यात एका व्यक्तीचा इतर कारणाने मृत्यू झाला. धाराशिव तालुक्यात एक, तुळजापूरात तीन आणि लोहाऱ्यात एक असे एकूण पाच नागरिक जखमी झाले आहेत.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
जिल्ह्यातील ८१ पाळीव जनावरे दगावली. यामध्ये ४७ मोठी, २७ लहान आणि ९ ओढकाम करणारी जनावरे आहेत.
धाराशिव तालुका : २९
परंडा : १६
भूम : ११
उमरगा : ९
तुळजापूर : ७
लोहारा : ५
कळंब : ४
घरांची पडझड, शाळांनाही फटका
पूरामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
धाराशिव : २४५
तुळजापूर : ९३
उमरगा : १००
लोहारा : ४१
भूम : २८
परंडा : १२
कळंब : २२
मिळून ५४१ कच्च्या घरांची पडझड झाली. धाराशिव तालुक्यातील ४५ झोपड्या पूर्णतः नष्ट झाल्या, तर २५ गोठे बाधित झाले. तसेच धाराशिव तालुक्यातील सहा शाळांची पडझड झाली असून शिक्षण व्यवस्थेलाही फटका बसला आहे.
एकूण ६११ मालमत्तांचे नुकसान झाले असून त्यात सहा सार्वजनिक मालमत्तांचा समावेश आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बाधित कुटुंबांना मदत व पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे.











