कळंब
मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यातील ईटकुर येथे शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा आणि मागण्या जाणून घेतल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या घामाने उभं केलेलं पीक मातीमोल झालं, घरं उद्ध्वस्त झाली, लेकरांच्या डोळ्यातलं भविष्य वाहून गेलं, आईच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर ओसंडतोय—अशी हृदयद्रावक कहाणी प्रत्येक गावात दिसते, असे ठाकरे म्हणाले.
असं असतानाही सरकार अजून पंचनाम्याची वाट का पाहतंय? डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत का? सरकारने तातडीने सरसकट मदत जाहीर करावी,” असा सवाल त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या लढ्यात शिवसेना खांद्याला खांदा लावून उभी आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला.
या वेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, आमदार दयानंद गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पुरजन्य परिस्थिती मध्ये स्वतहाच्या जिवाची पर्वा न करता लोकांची मदत केली आहे, असे कौतुक शिवसेना प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी यावेळी केले आहे.











