शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा महोत्सवी नाच
धाराशिव (प्रतिनिधी)
धाराशिव जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे. पिके वाहून गेली आहेत, जनावरे दगावली आहेत, घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. अशा बिकट परिस्थितीत मदतीच्या आशेवर डोळे लावून बसलेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. पुरग्रस्तांमधील ही पहिली आत्महत्या ठरली आहे. “घरात चूल पेटत नाही, पण कलेक्टर महोत्सवात नाचत आहेत,” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
मागील काही दिवसांपासून पाऊस थांबलेला नाही. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत, घरात अन्नधान्य नाही, घरं पडली आहेत, जनावरे वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांना आता “जगावे कसे?” असा प्रश्न पडला आहे. दुसरीकडे प्रशासनामध्ये नेमके काय चालले आहे, असा प्रश्नही शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
जिल्ह्याचा प्रशासन प्रमुख, जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार, तुळजापूर येथील सांस्कृतिक महोत्सवात फेटा बांधून नाचताना दिसले, आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. शेतकरी आत्महत्या करत असताना कलेक्टरांना त्यांचे दुःख दिसत नाही का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
पुरस्थितीने कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. लोक हातात बिस्किट मिळेल का? याची वाट पाहत आहेत, तर जिल्हाधिकारी नाचगाण्याच्या कार्यक्रमात रमले आहेत. मदत, पाहणी दौरे आणि तातडीचे निर्णय घेण्याऐवजी प्रशासन नृत्यात रमले असल्याचे पाहून लोकांचा विश्वासच उडला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले होते, त्यांना एनडीआरएफच्या जवानांच्या सहाय्याने वाचवण्यात आले. अशी गंभीर परिस्थिती असताना जिल्हाधिकारी महोत्सवात नाचत असल्याचे दुर्दैवी आहे.
तुळजापूर महोत्सवावर साडेआठ कोटींचा उधळपट्टी खर्च केला गेला. नवरात्राच्या निमित्ताने तुळजापूर येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असला तरी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील संकटामुळे महोत्सव रद्द करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र शासनाने ती मागणी नाकारली आणि महोत्सव सुरू ठेवला. पुरग्रस्तांसाठी एक वेळचे जेवण आणि डोक्यावर छप्पर मिळत नसताना एवढा पैसा नाचगाण्यात खर्च करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे.











