कळंब:
 शहरात बनावट कंपनीच्या दुचाकींच्या ट्यूब विक्रीचा मोठा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांच्या मदतीने खासगी तपास पथकाने जुन्या एसबीआय बँक रोडवरील एका सायकल दुकानावर छापा टाकत एका व्यक्तीला ताब्यात घेतले आणि सुमारे २९ हजार ७०० रुपये किमतीचा बनावट माल जप्त केला.
  मुंबई येथील आयपी इन्व्हेस्टिगेशन सर्व्हिस अँड डिटेक्टिव्ह सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीचे अधिकारी चौलाई विश्वकर्मा, सत्तार मुनाफ शेख (महाराष्ट्र राज्य रिजनल हेड), इसरार शेख आणि चेतन गणात्रा हे बनावट उत्पादनांच्या तपासासाठी कळंबमध्ये आले होते. जुन्या एसबीआय बँक रोडवरील व्यंकटेश सायकल दुकानात वेगवेगळ्या कंपनींच्या बनावट ट्यूब विकल्या जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.४५ च्या सुमारास पोलीस आणि या तपास पथकाने दुकानावर छापा टाकला. त्यावेळी दुकानात वरद अरुण भुतडा (वय २५, रा. एसबीआय बँक रोड, कळंब) हे होते. 
९० बनावट ट्यूब जप्त
तपासणीदरम्यान, वरद भुतडा याच्याकडे एका पांढऱ्या रंगाच्या गोणीत बनावट कंपनीच्या दुचाकींच्या काळ्या रंगाच्या ९० ट्यूब आढळल्या. प्रत्येक पाकिटाची किंमत ३३० रुपये असून, एकूण या मालाची किंमत २९,७०० रुपये इतकी आहे. पोलिसांनी वरद भुतडा याला बनावट माल विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, बनावट उत्पादनांमुळे ग्राहक आणि संबंधित कंपन्यांची होणारी फसवणूक या कारवाईमुळे उघड झाली आहे.
			










