मुंबई
धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की उभारणीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी आता पालकमंत्री प्रताप सरनाईक आक्रमक भूमिकेत आले आहेत. “कंपनी आणि शेतकरी यांच्या मधे दलाल म्हणून उभे राहून लाखोंची कमाई करणाऱ्या मध्यस्थांचा सुळसुळाट तात्काळ थांबवा, असा थेट आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. पण दलालगिरी, धमक्या आणि फसवणूक करून शेतकऱ्यांचे शोषण चालले आहे. हे आता अजिबात सहन केले जाणार नाही.
या बैठकीला जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजारा, पोलीस अधीक्षक शफखत आमना, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तसेच पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.
सरनाईक यांनी पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले
दलालांविरोधात तक्रार येण्याची वाट पाहू नका. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर त्वरित सुमोटो गुन्हे दाखल करा. ते पुढे म्हणाले, पवनचक्की उद्योग हा जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे, पण त्याच्या आड शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची खात्री प्रशासनाने घेतली पाहिजे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शासनच ‘मध्यस्थ’ म्हणून उभे राहील, दलाल नव्हे!
धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पांच्या आड लपलेल्या दलालांच्या कारवाया आता चव्हाट्यावर आल्या असून, सरनाईक यांच्या आदेशानंतर प्रशासनात खळबळ माजली आहे.






