कळंब 
बस झाले आता शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे, सातत्याने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांना कचऱ्याची टोपली दाखवणाऱ्या निर्दयी सरकारला आता अखिल भारतीय छावा संघटना आणि मराठा युवा संघटनेच्या वतीने  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत भिकमागो ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे. 
अतिवृष्टी व सतत च्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे वारंवार अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारी धोरणांविरुद्ध हा संतापाचा भडका उडाला आहे. अखिल भारतीय छावा संघटना आणि मराठा युवा संघटनेच्या वतीने बेमुदत भिकमागो ठिय्या सुरू केले आहे. 
 ७०,००० रुपये भरपाई त्वरित द्या, मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी ७०,००० रुपये तत्काळ भरपाई द्यावी, २०२५ चा पिकविमा तात्काळ वितरित करा! यात कोणताही विलंब सहन केला जाणार नाही, ७/१२ कोरे करा! महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांचे सात-बारा तात्काळ कोरे करा, नदीकाठच्या जमिनी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २ लाख रुपयांची मदत तत्काळ देण्यात यावी, शैक्षणिक फी माफ करा आणि एसटी पास मोफत करा, शेतकऱ्यांच्या मुलांचे भविष्य वाचवा, रब्बीसाठी मोफत खत-बी! शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकही पैसा खर्च करावा लागू नये, पशुधनाच्या मृत्यूची किंमत ८० हजार! मृत झालेल्या प्रत्येक पशुधनास ८०,००० रुपये मदत द्या अशी मागणी आहे. 
विठ्ठल यादव यांचा अंतिम इशारा.. 
आम्ही आता नमणार नाही किंवा शांत बसणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्या सरकारने या मागण्या मान्य कराव्यात, जर सरकारला याचे गांभीर्य कळले नाही,  शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही.
			










