अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांनी घरं व पिकं गमावले, आता मुलांचे शिक्षणही संकटात..
कळंब
वडिलांची शेती पाण्यात गेली, घराचं छप्पर उडालं, आणि आता माझं शिक्षण थांबणार, हीच भीती आहे” या शब्दांत विद्यार्थी आपली वेदना व्यक्त करत आहेत. राज्यातील पुरग्रस्त भागातील उच्च व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
धाराशिव, बीड, लातूर आणि परभणीसह राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे शेती चे अतोनात नुकसान झाले, घरे वाहुन गेली आहेत, या अतिवृष्टीचा फटका मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर, अहिल्यानगर भागांना बसला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे अवघड झाले आहे.
यात पुरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यही मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहे. शेतकऱ्यांना व शेतमजुरांना आपल्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क भरणे अशक्य झाले असून, अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क भरण्यासाठी वारंवार मागणी केली आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गोष्टीचा कोणी विचार केलेला नाही.
धाराशिव, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या भागातील नागरीकांचे उपजिव्हेकेचे मुख्य साधन शेती असल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांच्या उत्पन्नाचे साधन अतिवृष्टी व पुरामुळे निसर्गाने हिरावून घेतले असल्याने त्यांना जगणेही अवघड झाले आहे.
आमदार कैलास पाटील यांनी मुलांच्या भविष्यासाठीची व मुलांचे शिक्षण चालु रहावे या करीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली आहे की, अतिवृष्टी तसेच पुरग्रस्त भागातील शासकीय व खाजगी महाविद्यालयांमध्ये उच्च व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळेल.
पुन्हा उभे राहील…
चुली पेटवायच्या की मुलांचं शिक्षण चालू ठेवायचे अशा संकटात शासनाने जर तातडीने हस्तक्षेप केला, आणि विद्यार्थ्यांना शुल्कमाफी दिली, तर अनेक घरातील दिवे पुन्हा पेटतील आणि पाण्यात गेलेलं भविष्य पुन्हा उभं राहील.
अशी व्यथा विद्यार्थ्यी मांडत आहेत.











