एक माजी नगरसेवक कॉग्रेस च्या गळाला
कळंब :
शहरातील शिवसेनेत पुन्हा एकदा बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. शहरप्रमुख गजानन चोंदे यांनी धनुष्यबाण सोडून उबाठा गटाची मशाल हाती घेतली आहे. या घडामोडीमुळे कळंब नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.
नगर पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये जोरदार लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही गटात उमेदवारी इच्छुकांची लगबग वाढली आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन चोंदे यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज झालेल्या चोंदे यांनी शिवसेनेला रामराम करत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या उपस्थितीत उबाठा गटात प्रवेश केला. या वेळी महेश कोळपे, मुकेश चोंदे, दीपक हारकर, आकाश चव्हाण, प्रसन्न हुलसुलकर यांच्यासह सुमारे पन्नास कार्यकर्त्यांनीही उबाठा गटात प्रवेश घेतला.
गजानन चोंदे यांनी पूर्वी तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते यांच्या नेतृत्वाखाली अनंतराव वाघमारे यांच्या सोबत राहून शिवसेनेचा पाया मजबूत करण्याचे काम केले होते. त्यावेळी शहरात शिवसेनेचा जनाधार कमी असला तरी त्यांच्या प्रयत्नामुळे पक्षाला गती मिळाली होती. नंतर अजित पिंगळे यांना उमेदवारी मिळाली आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांनीही धनुष्यबाण हाती घेतल्याने शिवसेनेची ताकद वाढली होती. मात्र सध्याच्या बंडखोरीमुळे पक्षातील अंतर्गत असंतोष पुन्हा उफाळला आहे.
काँग्रेसच्या गळाला माजी नगरसेवक
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांचे निकटवर्तीय व माजी नगरसेवक प्रताप मोरे यांनीही असंतोष व्यक्त करत काँग्रेसकडे झुकते माप दिले आहे. त्यांच्या पत्नी अर्चना मोरे यांना प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वसाधारण महिलेच्या जागेवरून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे मोरे दाम्पत्याने काँग्रेसचे सचिव पांडुरंग कुंभार यांच्यासोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या हालचालीमुळे शिवाजी कापसे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे. तर या नगर पालिका निवडणुकीत कॉग्रेस ची ताकद वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा महाविकास आघाडी होणार आहे.
राजकीय समीकरणे
कळंब नगर पालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेना आणि इतर पक्षांमधील बंडखोरीमुळे राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. प्रत्येक नेता बंडखोरी थांबण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने समिकरणे मांडत आहेत. पुढील काळात कोण उमेदवार सरस राहिल हे वेळ आल्यावर समजणार आहे.










