प्रवासी ताटकळले
कळंब
शहरातील बस आगारातील डिझेल पंप बंद पडल्यामुळे डिझेलचा पुरवठा नसल्यामुळे अनेक बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत. परिणामी, प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.गर्दीच्या वेळेत आणि सणासुदीच्या तोंडावर अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
कळंब बस आगारातील डिझेल भरणाऱ्या पंपाला तांत्रिक अडचण आल्यामुळे बसमध्ये डिझेल भरणे बंद झाले आहे. सकाळ पासुन बस च्या अनेक नियोजित फेऱ्या झाल्या नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात कामासाठी येणाऱ्या कामगारांना, विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना बस मिळाली नाही. त्यांना कामावर, शाळा व  रुग्णालयात पोहोचण्यास मोठी अडचण निर्माण झाली, काही जणांना नाइलाजाने खाजगी वाहनांकडून जास्त भाडे भरून गावी जावे लागले आहे. तर काही प्रवासी बस ताटकळत उभे राहून वैतागून गेले होते.
  बस स्थानकात झालेली प्रवाशांची गर्दी आणि एसटी महामंडळाचे भोंगळ व्यवस्थापन याचा थेट फटका सामान्य जनतेला बसत आहे. लोकांना काम, शिक्षण आणि आरोग्य यांसाठी प्रवास करणेही अडथळ्याचे झाले आहे. मात्र, प्रशासन डिझेल पंप पुरवठा सुरळीत करण्यास विलंब करत असल्याची चर्चा आहे. 
प्रशासनाने तातडीने डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा, बस फेऱ्या त्वरित सुरू कराव्यात आणि प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी. अन्यथा, नागरिकांचा राग नियंत्रणाबाहेर जाईल आणि प्रशासनावर जनतेचा दबाव वाढेल. एसटी महामंडळाने आपल्या ढिसाळ कारभारामुळे लोकांवर होणारा त्रास तात्काळ कमी करावा, अन्यथा हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करेल.
 
			










