कळंब
सध्या नवरात्र महोत्सवाची उत्साहपूर्ण धामधूम सुरू आहे. देवीची आराधना, जागरण आणि सांस्कृतिक उपक्रमांतून समाजात भक्तीभाव तर निर्माण होतोच, पण त्यासोबत प्रेरणादायी संदेशही दिले जातात. याच अनुषंगाने कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आढाळा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही “जागर स्त्रीशक्तीचा – सन्मान कर्तुत्वाचा” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच ज्योती वायसे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा अर्चना युवराज इंगळे व इंजिनीयर सुषमा धनंजय वायसे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपक्रमाचा शुभारंभ झाला. पहिले विचारपुष्प राजमाता जिजाऊंना अर्पण करण्यात आले.
नवरात्र हा स्त्रीशक्तीच्या जागृतीचा पर्व मानला जातो. त्याचाच प्रत्यय या उपक्रमातून आला. नवरात्रभर विद्यार्थ्यांना अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, राणी ताराबाई, मदर तेरेसा, इंदुताई सपकाळ, सुनीता विल्यम्स, पी. टी. उषा अशा कर्तृत्ववान स्त्रियांच्या प्रेरणादायी कार्याचा परिचय करून दिला जाणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते महादेव खराटे यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार शिक्षिका शिवनंदा स्वामी यांच्या हस्ते तर आभार प्रदर्शन तुकाराम कराळे यांनी केले. जेष्ठ शिक्षक बलभीम राऊत व स्वयंसेवक बापू हगारे यांनी विशेष परिश्रम घेतले. गावातील माता-पालक, महिला व माजी विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
शेवटी उपस्थितांना केळीचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. मात्र, प्रत्यक्षात या उपक्रमातून सुरू झालेला स्त्रीशक्तीचा जागर हा समाजपरिवर्तनाचा नवा अध्याय ठरत आहे.











