कळंब
अतीवृष्टी च्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फक्त पाहणीचा फार्स न करता शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्त ७०० कुटुंबांना किराणामालाच्या साहित्याची मदत करण्यात आली आहे.
कळंब तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक गावांचा उध्वस्त संसार डोळ्यासमोर उभा राहिला आहे. शेतपिके, घरातील धान्य आणि संसाराचे साधनसामग्री वाहून गेल्याने नागरिक उपासमार व हतबलतेच्या स्थितीत आहेत. अशा वेळी केवळ पाहणीचा दिखावा न करता शिवसेना नेते अजित पिंगळे यांनी थेट पूरग्रस्तांच्या वेदना जाणून घेतल्या. डोळ्यांतले अश्रू, पोटातील भूक आणि ढासळलेले आयुष्य पाहून त्यांनी ही व्यथा शासनापर्यंत पोहोचवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी थेट संवाद साधून परिस्थितीची गंभीरता मांडली. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्यातून पिंगळे यांनी पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य व किराणा किटचे वाटप केले. या मदतीमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला.
त्याचबरोबर शिवसेना डॉक्टर सेलच्या वतीने आथर्डी येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. संसर्गजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरणाची तयारीही करण्यात आली आहे.
या यावेळी मराठवाडा युवासेना निरीक्षक किरण गायकवाड, महाराष्ट्र राज्य डॉक्टर प्रदेश प्रमुख डॉ. धनंजय पडवळ, अनुसूचित जाती-जमाती प्रदेशाध्यक्ष डी. एन. कोळी, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनंत वाघमारे, भाजप तालुकाध्यक्ष अरुण चौधरी, उमरगा तालुकाप्रमुख बळी सुरवसे, लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ, कळंब तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, सरपंच अमोल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास पाटील, अनंत लंगडे यांच्यासह विविध गावांचे सरपंच-उपसरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते.
या गावात पोचली मदत..
कळंब तालुक्यातील आथर्डी, इटकूर, गौर या गावातील पूरग्रस्त नागरिकांना तब्बल ७०० अन्नधान्य व किराणा किट चे वाटप शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्या माध्यमातून करण्यात आले.











