कळंब
तालुक्यातील हासेगाव (शि.) येथील ग्रामपंचायत कार्यालयात अज्ञात व्यक्तीने आग लावून शासकीय दस्तऐवज जाळल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
घटना दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजल्यापासून दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या दरम्यान घडली आहे.
अज्ञात व्यक्तीने एका लाकडी काठीला कपडा गुंडाळून ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील खिडकीसमोरील उघड्या कपाटात ठेवलेल्या शासकीय दस्तऐवजांना आग लावली. या आगीत महत्त्वाचे कागदपत्रे जळून नुकसान झाले आहे. घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र धोडीराम राठोड यांनी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२४(३) तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेचा तपास पोलीस करीत असून संबंधित आरोपीचा शोध सुरू आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील शासकीय दस्तऐवजांना आग लावण्यामागे नेमका उद्देश काय, याचा तपासातून उलगडा होण्याची अपेक्षा आहे.










