पक्ष बदलणारे बाजार बसवे शेतकऱ्यांना मदत काय करणार? करजखेडा येथील शेतकरी संवादास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव
अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, पिके वाहून गेली, शेत मोकळे पडले. सरकारने ३१ हजार ८०० कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले असले, तरी त्याचा लाभ आजवर शेतकऱ्यांना मिळालाच नाही. शेतकऱ्यांशी केलेली ही दगाबाजी आहे. म्हणूनच या दगाबाज सरकारला दगाबाजीनेच हरवायला पाहिजे, असा संतप्त स्वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढला.
धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हा प्रवक्ता जगदीश पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल वडणे, तसेच अन्य शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, मी जेव्हा सत्तेत होतो, तेव्हा कोरोनाकाळात शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी दिली, शिवभोजन थाळी सुरू केली, आनंदाचा शिधा दिला. हे उपकार नव्हते, तर माझे कर्तव्य होते, असे ठाकरे म्हणाले. पण सध्याचे सरकार खोट्या आश्वासनांनी सत्तेवर येऊन शेतकऱ्यांची फसवणूक करते. मदतीचे फोटो काढून प्रसिद्धी मिळवते, पण प्रत्यक्षात मदत कुठेच पोहोचत नाही. जाहीर केलेल्या पॅकेजमधील पैसा कुठे गेला? निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार’ म्हणणारे आता कुठे लपले? असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
जमीन पार्थ पवारांना कशी?
विरोधी पक्षनेते आमदार रावसाहेब दानवे यांनी गंभीर आरोप केला की, भीमा कोरेगाव परिसरातील ४० एकर जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पुत्र पार्थ यांच्या कंपनीला दिली. बाजारभावानुसार ही जमीन किमान १८०० कोटींची असून फक्त ३०० कोटींना दाखवण्यात आली. मुद्रांक शुल्क माफ करून सर्व नियम धाब्यावर बसवले गेले. हे स्पष्टपणे गैरव्यवहाराचे उदाहरण आहे.”
दानवे पुढे म्हणाले, “राज्य सरकार म्हणते, पुरग्रस्तांना हेक्टरी साडेतीन लाख रुपये देणार. पण एक रुपयादेखील मिळाला नाही. ही घोषणा म्हणजे दिवास्वप्न आहे.
सोयाबीनचे भाव पडले, सरकार गप्प
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले, सोयाबीनचे भाव ११ हजारांवरून चार हजारांवर आले. कारण मोदी सरकारने आयात शुल्क कमी केले. शेतकऱ्याला हमीभाव दिलात तर तो भीक मागणार नाही. उद्धव ठाकरे हे मते मागायला नाही, तर तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायला आले आहेत.










