धाराशिव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
धाराशिव :
धाराशिव पोलिसांनी पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. तब्बल 2 कोटी 13 लाखांचा रुपयांची चोरीचा मुद्देमाल आणि आरोपी उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय यश मिळवले आहे. या यशस्वी तपासाबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी धाराशिवला भेट देऊन अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि प्रशस्तीपत्रे देऊन गौरव केला.
तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीतील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सोलापूर शाखा तुळजापूर येथील चोरी प्रकरणाचा यशस्वी तपास करून धाराशिव पोलिसांनी तब्बल ₹2 कोटी 13 लाख 19 हजार 703 रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि आरोपी उघडकीस आणले आहेत. या प्रकरणातील उत्कृष्ट तपासासाठी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, चालक पोलीस हवालदार सुभाष चौरे, महेबुब अरब, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोलीस अमलदार प्रकाश बोईनवाड (स्थानिक गुन्हे शाखा) यांना विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीतील लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप सोसायटी लि. सोलापूर शाखा तुळजापुर येथील 34,60,860 रुपये रोख रक्कम आणि 2 किलो 722 ग्रॅम सोने (किंमत ₹1,78,58,897) असा एकूण ₹2,13,19,703 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या वेळी सहा पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, शैकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, दत्तात्रय राठोड (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, सहा पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे, पोलीस हवालदार शिवाजी राऊत, भुजंग आडसुळ, राहुल खताळ, लक्ष्मण डिकाळे, सूर्यजित जगदाळे, पोलीस अमलदार सागर कंचे, प्रमोद पेनुरकर, महिला पोलीस हवालदार शबाना सय्यद (पोलीस ठाणे परंडा), तसेच सहा पोलीस निरीक्षक भालेराव, पोलीस उपनिरीक्षक भोजगुडे, पोलीस अमलदार जाधव (पोलीस ठाणे येरमाळा) यांना देखील प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांनी अधिकाऱ्यांना मालमत्तेविषयक आणि शरीराविरुद्धचे न उघडलेले गुन्हे जास्तीत जास्त प्रमाणात उघडकीस आणण्याच्या तसेच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच धाराशिव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.











