धाराशिवला जंक्शनचा दर्जा; अर्थकारणाला मिळणार नवी गती
धाराशिव :
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गासाठी तब्बल ३२९५ कोटी रुपये खर्चाचा सुधारित आराखडा राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. त्यामुळे धाराशिवला जंक्शन रेल्वे स्थानकाचा दर्जा मिळणार असून, या प्रकल्पामुळे प्रदेशाच्या अर्थकारणाला नवसंजीवनी मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव खर्चानुसार निधीची तरतूद करण्याची मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. रेल्वे बोर्डाने ५० टक्के निधी मंजूर केल्यानंतर उर्वरित हिस्सा राज्य सरकार उचलणार आहे. पूर्वी मंजूर झालेला प्रकल्प ९०४ कोटी ९२ लाखांचा होता. मात्र विविध कारणांमुळे तो रखडला आणि प्रकल्प खर्चात तब्बल ११७ टक्क्यांची वाढ झाली. मागील अडीच वर्षापासून काम थांबले होते. आता महायुती सरकारने वाढीव १००० कोटींचा राज्य वाटा मंजूर केल्याने प्रकल्पाला गती मिळणार आहे.
तिप्पट मोठे होणार धाराशिव स्थानक
धाराशिव रेल्वे स्थानकाची इमारत ४ हजार चौरस मीटरवरून १२ हजार ६३० चौरस मीटर इतकी विस्तारित होणार आहे. प्रवासी आणि कर्मचारी यांच्यासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा उभारल्या जातील. रस्त्यांच्या वरून आणि खालून जाणाऱ्या पुलांची संख्या २० वरून ३१ करण्यात आली आहे.
सोलापूर-धुळे महामार्गावरील मुख्य पूल ३८५ मीटरवरून ३९९ मीटर इतका वाढविण्यात येईल. जलदगती रेल्वेसाठी स्वतंत्र ट्रॅक आणि लूप लाईनची सोय केली जाईल. पथमार्ग, दादरा, प्लॅटफॉर्मसह भूमिगत पाणीटाक्या आणि नवीन निवासस्थानांचा समावेश आराखड्यात आहे.
तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र राष्ट्रीय नकाशावर
या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र तुळजापूर राष्ट्रीय रेल्वे नकाशावर झळकणार आहे. तुळजापूर – सोलापूर दरम्यानचा रेल्वेमार्गही आता गती घेईल. सुधारित आराखड्यामुळे फक्त रेल्वेसेवा सुधारेल असे नाही, तर धाराशिव, तुळजापूर आणि सोलापूर या तिन्ही शहरांच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.











