पोलिसांची मोठी कामगिरी
कळंब
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला कळंब येथून अटक करून चोरीच्या चार मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत. या कारवाईमुळे अलीकडच्या काळात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पथक कळंब येथे आले असता, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम चोरीच्या मोटारसायकल विक्रीसाठी आणले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चार मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, त्या विविध ठिकाणांहून चोरीस गेल्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
अटक केलेले आरोपी हे अर्जुन साहेबराव काळे (वय २९, रा. वाकडी पारधी पिढी, ता. कळंब) आणि नितीन विश्वास शिंदे (वय २५, रा. नांदूर, ता. केज, जि. बीड, ह.मु. मांडवा, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून एकूण रु. १,५५,००० किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही मोहीम पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, तसेच पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, चापोका रत्नदीप डोंगरे आणि नागनाथ गुरव यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.
पोलिसांकडून आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून, आणखी काही चोरीच्या प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











