कळंब : 
एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प कळंब अंतर्गत येरमाळा विभागातील चोराखळी येथील मारुती मंदिरात पोषण अभियानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. स्थानिक पौष्टिक अन्नधान्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    येरमाळा विभागातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यावेळी स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नधान्यांपासून तयार केलेल्या विविध पोषक पाककृतींचे भव्य प्रदर्शन भरवले. महिलांना पोषणाचे महत्त्व सहजपणे समजावे यासाठी आकर्षक सजावट आणि धान्यापासून सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
   कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चोराखळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा सोनटक्के यांनी भूषवले. विभागाच्या पर्यवेक्षिका अनुपमा बोरफळकर यांनी उपस्थित माता आणि महिलांना ‘पोषण अभियान’ आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
   कार्यक्रमादरम्यान रानभाज्या, फळे आणि फुलांची आकर्षक मांडणी करण्यात आली, तसेच सेवा प्रवेशोत्सव, किशोरी मार्गदर्शन, आणि गरोदर व स्तनदा मातांसाठी पोषण विषयक सत्रांचे आयोजन करण्यात आले. लहान मुलांनी विविध वेशभूषा सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी कार्यकर्ती पद्मश्री मैदाड यांनी केले, तर मनीषा सोनटक्के यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दैवाशाला बोधले, बबिता रणदिवे, स्वाती डोंगरे आणि रेश्मा डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
गरोदर मातांसाठी विशेष उपक्रम:
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्फे प्रथमच गरोदर झालेल्या मातेला बेबी केअर किट प्रदान करण्यात आले. तसेच, गरोदर मातांसाठी योग्य आणि संतुलित आहाराचे महत्त्व दाखवणारी ताट रांगोळी साकारण्यात आली होती. विशेष म्हणजे, कडधान्यांचे पोषणातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कडधान्यांपासून गणपतीची सुरेख रचना करण्यात आली होती.
			





