कळंब
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकार फक्त पाहत बसलंय. आता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रणसंग्राम उभा करावा लागेल. गेल्या १०० वर्षांत असं आंदोलन कोणी केलं नसेल, पण आता ते करावंच लागेल असा आक्रमक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
कळंब तालुक्यातील डिकसळ येथे झालेल्या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव द्यायचा असेल, कर्जमुक्ती करायची असेल, आणि नुकसानीची शंभर टक्के भरपाई द्यायची असेल, ताकदीचं आंदोलन उभारावं लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकार ला दिला आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला आहे. ते गोर गरीब मराठ्यांशी बेईमानी करणार नाहीत. शासन निर्णयानुसार कुणबी प्रमाणपत्राचं वाटप तातडीने सुरू केलं पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे.
सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले, जो कुणी हा जीआर रद्द करण्याची भाषा करेल, त्याला आधी करून दाखवायला सांगा, शासनाने दिवाळीपर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटप पूर्ण करा, मराठ्यांच्या मुलांना प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कोणतीही शासकीय भरती घेऊ नका, असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, कुणबी प्रमाणपत्राचा शासन निर्णय हा ७५ वर्षातील ऐतिहासिक विजय आहे. हा जीआर आम्ही लढून मिळवला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी चांगलं काम केलं, पण आता वाट बघणं थांबवा, प्रमाणपत्र वाटप सुरू करा, मराठवाड्यातील प्रत्येक मराठ्याला १०० टक्के कुणबी प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे.









