महायुती मधील दोन घटक पक्षांचा स्वबळाचा नारा
कळंब (प्रतिनिधी)
कळंब नगर पालिका निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) नेही स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे आगामी नगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसू शकतो. यावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर उमेदवारी संदर्भातील पोस्ट्स सुरू केल्या असून, शहरातील नेत्यांकडून कार्यकर्त्यांना निवडणूक तयारीचे आदेश दिले गेले आहेत असे कार्यकर्ते प्रभागातील मतदारांना सांगु लागले आहेत, घटक पक्षांना विश्वासात घेतले जात नसल्यामुळे नाराजी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असून, त्यावर शिवसेनेने अजूनही कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही, असे राष्ट्रवादीचे पदाधिकारी सांगतात. त्या पाठोपाठ रिपाईनेही बंडाचा सूर धरला आहे. त्यामुळे महायुती मधील दोन घटक पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. याचा परिणाम महायुती वरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महायुती मधील प्रमुख पक्ष शिवसेना घटक पक्षांची नाराजी काढण्यास कितपत यशस्वी होते. हे पुढील काळात समजणार आहे.
रिपाईची बैठक संपन्न
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ची बैठक मराठवाडा प्रदेश सचिव बंडुभाऊ बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत पक्षाने नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. या बैठकीस तालुका अध्यक्ष शिवाजी सिरसट, युवक तालुका अध्यक्ष विपिन हौसलमल, शहर अध्यक्ष सुधीर बनसोडे, मुकुंद मामा साखरे, नामदेव गायकवाड, नामदेव नाना आदींची उपस्थिती होती. तसेच अमोल जगताप, इकबाल तांबोळी, विश्वजित बनसोडे, आदर्श शहाजी सिरसट, विनोद बचुटे, सागर ताटे, संग्राम बनसोडे, गौतम सिरसट, सुरज गाडे, यश बनसोडे, रोहन कोळपे, निलेश जगताप, राजाभाऊ घाडगे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
तीन प्रभागांमध्ये रिपाईचा प्रभाव
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा प्रभाग क्रमांक ३, ४ आणि ८ मध्ये चांगला प्रभाव आहे. त्यामुळे रिपाईने स्वतंत्र उमेदवारी दिल्यास या प्रभागांमध्ये महायुतीच्या मतांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कळंबच्या निवडणुकीत या निर्णयाचा मोठा राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.











