शेतकऱ्यांचा आक्रोश
कळंब 
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आकाश कोसळलं! मुसळधार पावसाने कळंब तालुक्यात जनजीवन विस्कळीत केलं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
बाभळगाव परिसरात थेट गावात पाणी शिरल्याने अनेक घरात पावसाचं पाणी साचलं आहे. संसारोपयोगी साहित्य भिजून खराब झालं असून, नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून अंदोरा–बाभळगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
ग्रामीण भागाला जोडणारे कोठाळवाडी, भोगजी आणि खामसवाडी–मोहा हे रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांना आता लांबच्या आणि खडतर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
सर्वात मोठा फटका मात्र शेतकऱ्यांना बसला आहे. खामसवाडी शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने शेतात साचलेल्या पाण्यामुळे उभं पीक आडवे पडलं आहे. सोयाबीन, मूग, उडीद, तूर यासारख्या पिकांचं नुकसान झालं आहे. नुकतीच सावरू लागलेली शेती पुन्हा उद्ध्वस्त झाली आहे. शेतकरी हातात डोकं घेऊन बसले आहेत. “कर्ज, मेहनत आणि आशा – सगळं पाण्यात गेलं,” असं शेतकऱ्यांचं हतबल उद्गारात दिसत आहे.
दहिफळ ओढ्याची पातळी धोक्याच्या टप्प्यावर पोहोचली असून प्रशासनानं नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणी जाणं टाळावं आणि आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
विसर्ग वाढ
मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या सांडव्याच्या सहा वक्रद्वारे एक मीटरने विसर्ग सुरू आहे. सध्या मांजरा नदीपात्रात १८,७४५ क्युसेक्स इतका विसर्ग होत असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
			










