आरोग्याच्या कामांवर राजकारण नको
धाराशिव 
सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ थांबवा! फक्त ६७ लाख रुपयांच्या ट्रान्सफॉर्मरसाठी तब्बल २४ कोटी रुपये खर्च करून उभी केलेली कॅथ लॅब धूळ खात पडून आहे. जिल्हा नियोजन समिती निधीवरील स्थगिती कायम ठेवून शासनाने आरोग्य सुविधेला वेठीस धरल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना तात्काळ स्थगिती उठवण्याचा सणसणीत इशारा दिला आहे. 
२४ कोटी रुपये खर्च करून सुविधा उभी करायची आणि फक्त ६७ लाख रुपयांसाठी ती बंद ठेवायची, हा कोणता मूर्खपणा आहे? जनतेच्या आरोग्याच्या विषयात राजकारण करणारे सरकार कोणती संवेदनशीलता दाखवत आहे? हेवेदावे बाजूला ठेवा, औषधे उसनवारीवर घेण्याची वेळ’ डीपीडीसी निधीच्या स्थगितीमुळे रुग्णालयात केवळ कॅथ लॅबच नाही, तर औषध खरेदीचेही हाल सुरू आहेत. रुग्णांना लागणारी औषधे उसनवारीवर घ्यावी लागणे, हे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे अपयश आहे.
राज्यकर्त्यांच्या हेकेखोरपणामुळे हृदयविकारग्रस्तांचे हाल.. 
धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभारलेली ही कॅथ लॅब हृदयविकार रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. इथे अँजिओप्लास्टीसारखी अत्यावश्यक शस्त्रक्रिया होऊ शकते. मात्र, अत्यंत किरकोळ अशा ६७ लाख रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेचे काम डीपीडीसी निधीवरील स्थगितीमुळे अडले आहे.
आमदार कैलास पाटील आक्रमक… 
राजकारण, आपापसातील मतभेद आणि हेवेदावे तत्काळ बाजूला ठेवा. आमचे हेवेदावे आमच्या ठिकाणी ठेवा, पण सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळू नका. माननीय मुख्यमंत्र्यांनी या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन आरोग्याच्या कामांवरील ही स्थगिती तातडीने उठवावी. एमआरआय मशीन लवकरच सुरू होणार असून, ५० बेडच्या आयसीयूचे कामही पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितले. मात्र, सरकारने तात्काळ कॅथ लॅबचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलन अटळ आहे!
			





