- शहरात जय्यत तयारी
कळंब, ( प्रतिनिधी)
कळंब शहरात बुधवारी 26 मार्च रोजी जिजाऊ रथ यात्रेचे संध्याकाळी साडेसहा वाजता आगमन होणार आहे.
क्रीडा संकुलपासून ढोकी रस्त्यावरील जिजाऊ चौक पर्यंत या रथ यात्रेचे ढोल, ताशा, लेझीम पथकासह स्वागत करण्यासाठी कळंब नगरी सज्ज झाली आहे.
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तोम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संभाजी ब्रिगेड महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ही रथयात्रा काढण्यात आली आहे. दिनांक 26 मार्च रोजी कळंब शहारात रथ यात्रेचे आगमन होणार आहे. महाराष्ट्र ही संताची व महामानवाची जन्मभुमी आणि कर्मभुमी आहे.

शेकडो वर्षापासून संत महात्मे आणि महामानवांच्या पुरोगामी विचारांने देशाला व माणसांना जोडणाऱ्या शिव, फुले, शाहु, आंबेडकर विचारांने राज्याला व देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. पंरतु मागील काही वर्षात राज्यातील सामाजिक, धार्मिक व राजकीय वातावरण बिघडले आहे.
काही शक्ती राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा व महापुरुषांची बदनामी करत सतत जातीय व धार्मिक तेढ निर्माण करुन महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहे. आज जगातील ज्या देशात धार्मिक, जातीय व वर्णभेद निर्माण झाले, ते देश रसातळाला गेले आहे.

तसे आपले होवू नये यासाठी महाराष्ट्रात जाती-जातीमध्ये सलोखा व धार्मिक एकोपा निर्माण करण्यासाठी तसेच माणसे जोडत त्यांच्या मध्ये एकता बंधूता निर्माण करण्यासाठी या रथयात्रेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून तरुणांमधील व्यसनाधिनता कमी करत तरुणांना रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करत सहकार्य करत बेरोजगारी कमी करणे तसेच व्यसनाधिनता व बेरोजगारीमुळे निर्माण झालेले अविवाहीतांचे प्रमाण कमी करत कुटुंब सुखी समाधानी कसे होईल या संदर्भात जिजाऊ रथयात्रेद्वारे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड यांनी संगितले.