शिवसेनेचा कटाक्षदार इशारा
कळंब 
नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न कायम प्रलंबित असल्याने संतप्त शिवसैनिकांनी प्रशासनाला थेट निवेदन दिले आहे.
जुलै २०२१ च्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार सर्व्हे क्रमांक ७/ब मधील दोन एकर जागेत इदगाह मैदान विकसित करण्याचा निर्णय आधीच मंजूर झाला असून भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीही झालेली आहे. मात्र अद्याप त्या जागेचा विकास न करता निर्णय प्रलंबित ठेवल्यामुळे स्थानिक समाजात असंतोष वाढत आहे.
त्याचप्रमाणे, पुनर्वसन सावरगाव, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर या स्थळांचा तीर्थक्षेत्रात समावेश करण्याची तातडीची मागणी करण्यात आली आहे. स्थानिकांच्या धार्मिक आणि सामाजिक भावनांचा सन्मान करून ही ठिकाणे तीर्थक्षेत्रात समाविष्ट करावीत, नगरोध्यान महाअभियानांतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरू करावे, कळंब शहरात अतिरिक्त सफाई कर्मचारी नेमून दोन आठवड्यांची व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या निधीतून होळकर चौकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांचे शिल्पस्तंभ उभारावेत, अशा मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहर निवडणूक प्रभारी संजय मुंदडा, ज्येष्ठ नेते प्रा. संजय कांबळे, तालुका प्रमुख सचिन काळे, शहरप्रमुख विश्वजीत जाधव, सुधीर भवर, सागर मुंडे, विठ्ठल समुद्रे, मोहसीन मिर्झा, अॅड. मंदार मुळीक, शंकर वाघमारे, संघर्ष कांबळे, शुभम करंजकर, डॉ. रुपेश कवडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या दिवशी करू आंदोलन… 
शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, “जनतेचे प्रश्न केवळ फाईलमध्ये न ठेवता प्रत्यक्ष कृती करा. अन्यथा २ नोव्हेंबर रोजी कळंब शहर साक्षीदार राहील — शिवसेनेचा धडक मोर्चा नगरपरिषदेवर उतरेल,” असा इशारा देण्यात आला आहे.
स्पष्ट शब्दांत इशारा
शिवसेनेने प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले आहे की, “लोकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नका. आम्ही निवेदन देतो आहोत, पण वेळेत पावले उचलली नाहीत तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहर निवडणूक प्रभारी संजय मुंदडा यांनी दिला आहे.
			










