कळंब 
 विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून, नियमित व्यायाम करावा व गुरुजनांचा उपदेश काळजीपूर्वक ऐकून कठोर अभ्यास केल्यास ते उद्याच्या उज्वल भारताचे सक्षम नागरिक बनू शकतील, असे प्रतिपादन कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले यांनी केले.
कळंब तालुक्यातील आढाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तहसीलदार हेमंत ढोकले आणि तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शालेय परिसर, स्वच्छता, आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली. या उपक्रमांवर तहसीलदार ढोकले यांनी समाधान व्यक्त केले.
उपस्थित शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार ढोकले म्हणाले की, “आजच्या काळात विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून पूर्णपणे दूर राहायला हवे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ आवश्यक असल्याने सर्वांनी खेळांमध्ये नियमित सहभाग घेऊन व्यायाम करावा.” तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना सकस आहार घेण्याचा व दैनंदिन नियमित अभ्यास करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी गुरुजनांनी दिलेला उपदेश काळजीपूर्वक ऐकल्यास ते आपल्या आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करून उद्याचे उज्वल भारताचे सक्षम नागरिक होऊ शकतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक महादेव खराटे यांनी केले, तर सहशिक्षक तुकाराम कराळे यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक बलभीम राऊत आणि शिवानंद स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले.
			










