कळंब
हातात ओले सोयाबीन आणि हातात चाबूक घेऊन शेतकरी संतप्त झाले. ओला दुष्काळ घोषित करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्तारोको आंदोलन केले.
मे महिन्यापासून सुरू झालेल्या सततच्या पावसात मागील पंधरा दिवसांत धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदीकाठच्या तसेच इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पिकांचे जवळजवळ १००% टक्के नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जमीन वाहून गेली आहे. घरांची व गोठ्यांची पडझड झाली आहे. गुरेढोरे दगावली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे तातडीचे असल्याची मागणी आंदोलनात करण्यात आली.
पुरग्रस्त भागातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून स्थायी उपाययोजना करावी. सरसकट शेतकऱ्यांना निकषाबाहेर जाऊन हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, सर्वांना कर्जमाफी जाहीर करावी आणि कर्जवसुली तातडीने थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात शेतकरी व शेतमजूर संघर्ष समितीच्या वतीने रस्तारोको करून नायब तहसीलदार गोकुळ भराडिया यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अतुल गायकवाड, सचिन काळे, बाळकृष्ण भवर, दत्ता कवडे, ज्योती सपाटे, रुक्शाना बागवान, सुंदर लोमटे, राहुल चोंदे, अॅड. अशोक चोंदे, मालोजी पाटील, पंडित देशमुख आदी शेतकरी उपस्थित होते.











