लातुर 
लातूर तालुक्यातील रामेश्वर येथील श्री सरस्वती विद्यालय, रामेश्वर येथे तब्बल २५ वर्षांनंतर रंगलेला स्नेहमेळावा हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर भावना, आठवणी आणि आपलेपणाचा उत्सव होता. सन १९९९-२००० च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या प्रांगणात पाऊल ठेवले, आणि क्षणात जुन्या आठवणींनी मन भरून आलं. वर्गातल्या गमती-जमती, शिक्षकांची ओरड, मधल्या सुट्टीतली मस्ती, आणि मित्रांच्या खोड्या—सगळं पुन्हा डोळ्यांसमोर उभं राहिलं.
मुख्याध्यापक प्राचार्य बी. एल. नागरगोजे यांनी भावनिक मनोगतात सांगितले, “तुम्ही सगळे आज समाजात आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहात, हीच आमच्या शाळेची खरी शान आहे. निरोगी राहा, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. आज तुम्ही सर्व पालक आणि जबाबदार नागरिक आहात—तुमच्यातूनच समाज घडतो.”
२५ वर्षांनंतर पुन्हा भेटलेले हे विद्यार्थी आता उद्योगपती, राजकारणी, पत्रकार, शिक्षक, व्यापारी, शेतकरी, नोकरदार आणि गृहिणी म्हणून समाजात वेगवेगळ्या क्षेत्रांत नाव कमावत आहेत. पण त्या दिवशी सगळ्यांनी आपले पद, प्रतिष्ठा, जबाबदाऱ्या विसरून पुन्हा एकदा “विद्यार्थी” होण्याचा आनंद घेतला.
हास्य, अश्रू, आठवणी आणि गाणी यांच्या संगमाने कार्यक्रम अविस्मरणीय झाला. गीत-संगीत, नाट्यछटा, मिमिक्री, विनोदी केबीसी आणि नृत्य सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. काही क्षणांसाठी काळ थांबल्यासारखा वाटला—जणू २५ वर्षांचा प्रवास मिटून पुन्हा शाळेच्या त्या निष्पाप दिवसांत सगळे परतले होते.
या प्रसंगी पर्यवेक्षक एस. पी. लाड, माजी मुख्याध्यापक बी. एम. शेप, व्ही. आर. सोनवणे, गायकवाड, संजय केंद्रे, चिलवंत, पांचाळ, दहिफळे आदी मान्यवर उपस्थित होते. सुमारे ६० माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात हजेरी लावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश खेडकर यांनी केले, सूत्रसंचालन शाम बोंदर यांनी करत कार्यक्रम रंगतदार ठेवला, तर अमोल गोळवे यांनी आभार प्रदर्शनाने समारोप केला.
			










