कळंब
तालुक्यातील आंदोरा येथे यश मेडिकल फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा या भावनेतून आयोजित या महोत्सवात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
चक्रवर्ती महासम्राट बळीराजाची भव्य मिरवणूक रथातून काढण्यात आली. लेझीम, झांजपथक, लोकनृत्य आणि शाळकरी मुलांच्या कलाप्रदर्शनांनी मिरवणुकीला विशेष रंगत आणली. शेतकऱ्याच्या जीवनाशी संबंधित पारंपरिक शेती उपकरणांचे प्रदर्शन हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.
कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना बळीवंश, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी आणि बळीराजाची प्रतिमा अशी पारितोषिके देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विनायक घोडके (बार्शी), सरपंच बळवंत तांबारे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, प्रा. जगदीश गवळी, अशोकराव तांबारे, ॲड. घनश्याम रितापुरे, रमजान शेख, संजय सावंत, पी.जी. तांबारे, ज्ञानेश्वर कुरडे, ॲड. अशोक चोंदे, बाबुराव शेंडगे सुमनताई तांबारे डॉ संदिप तांबारे आदी मान्यवर उपस्थित होते. ॲड.घनश्याम रितापुरे यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे, मोडी लिपीतील नोंदी शोधण्याची प्रक्रिया आणि हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळवण्याची पद्धत याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मदन तांबारे व राजाभाऊ लोंढे यांनी केले, तर यश मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संदीप तांबारे यांनी आभार मानले. या महोत्सवात प्रतिभा तांबारे, उषा कवडे, आशा तामाणे, सुवर्णा तामाणे, आशा काळे, अर्चना तांबारे, योगिता रत्नपारखी, हेमंत तांबारे, राजकुमार तांबारे, आदिनाथ कवडे, रशीद तांबोळी यांसह ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला. महिलांची उपस्थिती आणि सहभागही अत्यंत उत्साहवर्धक ठरला.
स्पर्धक विजेते:
लक्ष्मण तांबारे, श्रीहरी शिंदे, सुशांत तांबारे, विष्णू तांबारे, दिलीप कदम, सुरेश तांबारे, नागनाथ लांडगे, दत्ता तांबारे, नरसिंग कवडे, माणिक तांबारे.
या शेतकऱ्यांचा सन्मान
प्रतिभा शिवाजी तांबारे, उषा बबन कवडे, आशा राजेश तामाने, सुवर्णा बालाजी तामाणे, आशा विजय काळे, अर्चना अशोक तांबारे योगिता रत्नपारखी लक्ष्मण तांबारे अश्रुबा गायकवाड हेमंत तांबारे सुशीलदास गाडे अंकुश शिंदे राजाभाऊ दिघे आबा पाळे प्रशांत मुटके भैरव तांबारे राजकुमार तांबारे आदिनाथ कवडे जाणबा गाडे  राजेश कवडे, चांद शेख ,उत्तरेश्वर मिसाळ , आप्पा कांबळे अनंत हुलुळे रशीद तांबोळी या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
तुकाराम महाराजांनीच पहिली कर्जमाफी दिली: डॉ. तांबारे
यश मेडिकल फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप यांनी बोलताना “ईडा पीडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे” अशी गर्जना केली. देशातील पहिली कर्जमाफी तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांना दिली, म्हणून त्यांच्या ‘गाथे’चे पूजन व्हायला हवे. बळीराजाचे राज्य भारताबाहेर अफगाणिस्तान आणि श्रीलंकेपर्यंत पसरले होते. याचे सुंदर वर्णन महात्मा जोतीराव फुले यांनी त्यांच्या पुस्तकात केले आहे. एवढ्या मोठ्या बळीराजाला एका विशिष्ट समाजाने पाताळात घालण्याचे ‘पाप’ केले आणि आपल्याला कर्मकांडात जखडून ठेवले आहे. तुकाराम महाराजांनी पाहिले, वाचले आणि लिहिले, म्हणूनच त्यांना गाथेसह बुडवले गेले. एवढे असूनही आपण आजही राक्षस, दैत्य, दानव यांना वाईट समजतो. पण त्यांनी समाजाचे रक्षण करण्याचे काम केले आहे, याची आपणास माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांनी शेतकऱ्यांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवला आणि लढा दिला. तेच काम आता मनोज जरांगे पाटील करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रा. जगदीश गवळी म्हणाले की, आजचा वामन म्हणजे शेतकरी विरोधी व्यवस्था, उद्योगपती, व्यापारी आणि सावकार. शेतकऱ्यांनी स्मार्ट शेतीकडे वळले पाहिजे, तरच जगाचा पोशिंदा टिकेल.”
अतुल गायकवाड यांनी सांगितले “आजच्या काळातील वामन रूपी मनुवादी विचारधारा संपुष्टात आली पाहिजे. समाजजागृती हीच खरी क्रांती आहे.”
			










