प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ
कळंब
सावधान! तुमचा मतदानाचा हक्क धोक्यात येत आहे का? कळंब नगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरच प्रशासनाच्या बेफिकीरीचा आणखी एक नमुना समोर आला आहे. प्रारूप मतदार याद्यांमध्ये झालेल्या प्रचंड गोंधळामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. हे मतदार यादीचे काम आहे की कोणाचं राजकीय गणित? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नगर पालिकेने १० प्रभागांसाठी मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. पण या याद्यांमध्ये गोंधळ इतका की, एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबच दुसऱ्या भागात दाखवले गेले आहेत. यामुळे मतदारांचा विश्वास डळमळीत झाला आहे. “आमचं नाव कोणत्या प्रभागात गेलंय?” असा प्रश्न हजारो नागरिकांना पडला आहे.
कारण यामुळे हजारो मतदारांचा हक्क हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
हा लोकशाहीवरचा ‘थेट प्रहार’
कळंबमधील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. “हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर जाणूनबुजून केलेला डाव आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे मतदारांचा हक्कच धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकातुन नाराजीचा सूर आहे.
निवडणूक आयोगाकडे धाव घेणार..
या प्रकाराबद्दल अनेक नागरिकांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी सुरू केली आहे. मतदार यादी दुरुस्त न झाल्यास निवडणूक आयोगाकडे धाव घेणार
अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. यावर पालिका प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.
नगरसेवकांचे ‘संशयास्पद’ मौन
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, भावी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार या गंभीर प्रश्नावर पूर्णपणे गप्प आहेत. मतदारांचे नाव एका प्रभागात आणि मतदान दुसऱ्या ठिकाणी असेल, तर मतदान कसे होणार, या प्रश्नावर मौन बाळगणाऱ्या नगरसेवकांवर नागरिकांचा संशय वाढला आहे. लोकांच्या नावावरच मतांचा ‘खेळ’ मांडला जात आहे का? हा प्रश्न आता कळंबमध्ये चर्चिला जात आहे.
आम्ही रस्त्यावर उतरणार
कळंब नगर पालिका प्रशासनाने मतदार याद्यांमध्ये जाणीवपूर्वक गोंधळ केला आहे. हे लोकशाहीवरील विश्वासघात आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार 
शिवाजी सिरसट (रिपाई तालूकाध्यक्ष, कळंब)
हाच तो लोकशाहीचा गोंधळ
जिथे मतदाराचा हक्क कागदावर हरवतो आणि अधिकारी डोळेझाक करतात. आता प्रश्न असा आहे, मतदार जागा होणार का? की राजकारणी पुन्हा त्याचं मतदानही पळवणार? हे लवकरच समजणार आहे.
पाहणी करुन दुरुस्ती
प्रारुप मतदार याद्या संदर्भात नगर पालिका येथे हरकत नोंदवल्यानंतर पालिका कर्मचारी हे त्या प्रभागात जाऊन पाहणी करुन नंतर मतदार यादीतील नाव दुरुस्ती करणार आहेत. असे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे.
  प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी दिनांक ०८.१०.२०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर प्रारुप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी, अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणीत करुन प्रसिध्द करणे, मतदार केंद्राची यादी प्रसिध्द करणे असा मतदार याद्यांचा कार्यक्रम आहे.
			










