भाजपकडे सर्व प्रभागात उमेदवार तयार आहेत, सन्मानजनक वाटा मिळालाच पाहिजे
कळंब
नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करत महायुतीतील अंतर्गत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “भाजपचा उमेदवार ‘कमळ’ चिन्हावरच लढणार, यामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही,” असा ठाम पवित्रा भाजपचे शहराध्यक्ष मकरंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेतला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
नगर पालिका निवडणूक संदर्भात भाजपा कार्यालय पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना शहराध्यक्ष मकरंद पाटील म्हणाले की, भाजपने कळंब शहरात केलेल्या विकासकामांची यादी सादर करत, आमचा पक्षाच्या कार्यक्षमतेचा जोरदार प्रचार केला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून मंजूर झालेल्या कामांमध्ये रामेश्वर महादेव मंदिर, बाबा नगर, शास्त्री नगर परिसरातील सुशोभीकरण, बालोद्यान, ज्येष्ठ नागरिक उद्यान, तसेच विविध प्रवेशद्वार कमानींचा समावेश आहे. एकूण पाच कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असून, लवकरच ती प्रत्यक्षात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीतील जागावाटपाबाबत विचारले असता, पाटील म्हणाले की, “भाजपकडे सर्व प्रभागांमध्ये उमेदवार तयार आहेत. त्यामुळे महायुतीत भाजपाला सन्मानजनक वाटा मिळालाच पाहिजे.” त्यांनी संभ्रम निर्माण करणाऱ्यांना थेट इशारा देत सांगितले की, उमेदवारांची अंतिम निवड ही आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या निर्णयावर अवलंबून असेल.
या पत्रकार परिषदेला सतपाल बनसोडे, प्रशांत लोमटे, परशुराम देशमाने, संतोष भांडे, संजय घोगरे, किशोर वाघमारे, विकास कदम, हर्षद अंबुरे आणि माणिक बोंदर यांची उपस्थिती होती. यावरून स्पष्ट होते की, भाजपने निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू केली असून, महायुतीतील आपली ताकद अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.











