सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात
कळंब
शेतकरी नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला कळंब तालुक्यातील शेतकरी बांधवांनीही पाठींबा दिला असून शेतकऱ्यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णतः कोलमडले आहे. अशा परिस्थितीत सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोना काळात शेतीने देशाची अर्थव्यवस्था टिकवून ठेवली होती, मात्र आता अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या उध्वस्त झाले आहेत. सरकारने कर्जमाफीसाठी कोणतीही सिबिल अट न लावता नव्या कर्जाचे वाटप करावे, तसेच सोयाबीन, कापूस यासह इतर पिकांना हमीभाव देऊन खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या मागण्या आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्य झाल्या नाहीत, तर कळंब तालुक्यातील प्रत्येक गावात तसेच राज्यभरात लोकशाही मार्गाने धरणे, आंदोलने आणि उपोषणे करण्यात येतील.
या निवेदनावर अतुल गायकवाड, अॅड. मनोज चोंदे, आप्पासाहेब शेळके, शशिकांत निरफळ, ज्योती सपाटे, अशोक शिंदे, गुणवंत शिंदे, किरण देशपांडे, महादेव घुले, नितीन काळे, प्रदीप भोरे, प्रविण नाईकवाडी, तुकाराम साळुंखे, गोविंद आडसुळ, बाबुराव शेंडगे, सुदर्शन कोळपे, कमलाकर पाटील, धनंजय मोरे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.











