काँग्रेसचा स्वबळाचा निर्धार
कळंब
मित्रपक्षांच्या दुर्लक्षाला आता थेट उत्तर देत काँग्रेस पक्षाने कळंब नगर परिषद निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षपदासह सर्व २० नगरसेवक पदांवर उमेदवार उतरवण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली असून, या घोषणेमुळे स्थानिक राजकारणात चुरस निर्माण झाली आहे.
कळंब शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत काँग्रेस नेते तथा प्रभारी दादासाहेब मुंडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पांडुरंग कुंभार, प्रदेश सचिव सौ. स्मिता शहापूरकर, वरिष्ठ नेते भागवत धस, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार, शहराध्यक्ष शशिकांत निरफळ, ज्योती सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस अध्यक्ष आप्पासाहेब शेळके होते.
याबैठकीत स्पष्ट शब्दांत जाहीर केले की, मित्रपक्ष सन्मानाची वागणूक देत नसल्यास काँग्रेस कोणाच्याही दारात जाणार नाही, कळंब नगर परिषद स्वबळावर लढवणार अशी घोषणा करण्यात आली. तसेच बैठकीत संघटन बळकटीकरण, घराघरात संपर्क मोहीम, नागरिकांपर्यंत काँग्रेसच्या विचारधारेचा प्रसार आणि स्थानिक समस्यांवर ठोस पर्याय मांडण्यासाठी कृती आराखडे निश्चित करण्यात आले. सर्व कार्यकर्त्यांनी कळंब नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा आणि पक्षाला यशाच्या शिखरावर नेण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला. एकजुटीने आणि जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीस हरीभाऊ कुंभार, दिलीपसिंह देशमुख, शंकरराव करंजकर, रवी ओझा, विलास करंजकर, अंजली ढवळे, सचिन गायकवाड, भूषण देशमुख, रोहित कसबे, शीलानंद शिनगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वबळाच्या या भूमिकेमुळे काँग्रेसने कळंब नगर परिषदेतील निवडणुकीची लढत तापवली असून, पुढील काही दिवसांत स्थानिक राजकारणाचे समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.











