ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक
कळंब :
यंदा गुळपावडर कारखान्यांनी जाहीर केलेल्या कमी दरामुळे शेतकऱ्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे. उत्पादन खर्च भरमसाठ वाढलेला असतानाही कारखानदारांकडून उसाला फक्त २४०० रुपये प्रति टनचा अपमानजनक दर जाहीर करण्यात आला आहे. या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून गुळपावडर कारखान्यावर जाऊन पहिली उचल तीन हजार रुपये देण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
जयसिंगपूर येथे झालेल्या उस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी उसाची पहिली उचल ३७७१ रुपये मिळावी अशी ठाम मागणी केली होती. रिकव्हरी १२ पेक्षा अधिक असताना, साखर संचालकाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या कारखान्यांनी त्या प्रमाणावर योग्य दर देणे बंधनकारक असतानाही, कारखानदार शेतकऱ्यांची दिशाभूल करून कमी भाव जाहीर करत आहेत.
शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विष्णुदास काळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी कळंब तालुक्यातील विविध गुळपावडर कारखान्यांवर धडक देत निवेदनं सादर केली.
संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा
एकुरका येथील जगदंबा मंदिरातून मोटारसायकल रॅलीला दमदार सुरुवात करण्यात आली. ‘शेतकऱ्यांचा हक्क, तो मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही!’ अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. रॅली निपाणी, जागजी, तडवळा, मोहा, खामसवाडी, जवळा या मार्गावरून तुफान शक्तीप्रदर्शन करत पुढे सरकली. प्रत्येक कारखान्यावर पोहोचल्यावर शेतकऱ्यांनी ठिय्या देत प्रशासनाला निवेदनं दिली आणि स्पष्ट शब्दांत इशारा दिला आमच्या उसाचा दर ३००० रुपये घोषित करा, अन्यथा तोडणी रोखू आणि कारखान्यांवर तीव्र आंदोलन करू!”
कारखानदारांवर शेतकऱ्यांचा रोष
गेल्या वर्षीपेक्षा यंदा उसाचे उत्पादन कमी, खर्च जास्त आणि दर मात्र तोच! शेतकरी हवालदिल झाला असताना, कारखानदार मात्र नफा ओढत बसले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावर ठाम भूमिका घेतली असून आता कारखान्यांचा पुढचा निर्णय शेतकरी डोळ्यात तेल घालून पाहत आहेत.











