दिवाळीत दिलासा…
कळंब 
पावसाने उधळून टाकलेली दिवाळी, शेतात उभी राहिलेली ओलसर हुरहुर, घरात शिरलेली काळोखी या साऱ्याला ‘लोकजागर सामाजिक संस्थेच्या’ माणुसकीने भरलेल्या मदतीचा हात लाभला आणि अंधारलेल्या घरांमध्ये पुन्हा एकदा प्रकाशाचा दिवा उजळला.
अतिवृष्टीने बेचिराख झालेल्या कळंब तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी कुटुंबांचे जिवनचक्र थांबल्यासारखं झालं होतं. एकीकडे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान, तर दुसरीकडे घरात शिरलेल्या पाण्यामुळे अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तूंची अक्षरशः उध्वस्त अवस्था झाली. अशा वेळी ‘लोकजागर’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव पाटील जंजाळ यांच्या पुढाकाराने तब्बल ८०० मदत किट्स कळंब तालुक्यात पोहोचले, आणि दुःखाच्या काळोखात दिलासा देणारा एक दिवा तेवत राहिला.
  या उपक्रमात प्रभू गाढे, ग्रामसेवक लोखंडे, प्रा. वायाळ, विठ्ठल नाखोड यांच्यासह विठ्ठल माने व पत्रकार परमेश्वर पालकर यांनी या मदतीसाठी आग्रह धरला होता. आणि याला मान देत मदत वाटप करण्यात आली. यावेळी लोकजागर संस्थेचे अध्यक्ष केशव पाटील जंजाळ, जाफराबादचे सामाजिक कार्यकर्ते प्रभू गाढे, गजानन फड, सचिन तेलंगरे, आदित्य सोनी, गौरव कुदर, साहेबराव गावंडे आदी उपस्थित होते.
या गावांना मदत
एकूरगा, जवळा, पिंपळगाव (को), भोगजी, आडसूळवाडी, ईटकूर, गंभीरवाडी, बोरगाव (ध) अशा गावांमध्ये ही मदत घरोगरी पोहोचली. ती पोहोचवण्यासाठी झटणारे हातही तितकेच मोलाचे परमेश्वर पालकर, विठ्ठल माने, धनंजय घोगरे, अभयसिंह आडसुळ, शिवाजी पाटील, रामेश्वर जाधवर, रोहित आडसुळ यांचं कार्य उल्लेखनीय ठरलं
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण…
 पण यंदा या गावांतील काही घरांमध्ये हे दिवे लोकजागरने आणलेल्या माणुसकीच्या उजेडामुळेच लागले. मदतीच्या रुपात फक्त वस्तू नव्हत्या, तर त्या होत्या सहानुभूतीच्या, आपुलकी होती. 
एक सन्मान होता.. 
या किट्समध्ये केवळ अन्नधान्य नव्हते  गहू, तांदूळ, डाळ, तेल, रवा, साखर, इतकंच नव्हे तर ताट, तांब्या, साडी, ब्लॅन्केट अशा गरजूंना खरंच हवे असलेले साहित्य समाविष्ट होते. ही केवळ मदत नव्हती, तर त्यांच्या स्वाभिमानाला न मोडता दिलेला एक सन्मान होता.
			










